आनंदा जंगलातून कंदील घेऊन चालत होता. साग-चोर म्हणून तो पंचक्रोशीत कुख्यात प्रसिद्ध होता.
खांद्यावर चादरी, एका हाती कुर्हाड घेऊन तो घनदाट जंगलातून रस्ता शोधत पुढे जात होता. रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज, कोल्हेकुई ही त्याच्यासाठी नित्याचीच बाब होती. सागाची चोरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. झाडांचे अडथळे पार करत येणारे आजचे थंडगार वारे आनंदाला सुखावत होते. पानांची सळसळ आणि रातकिड्यांच्या किर्रर्र संगीतात आनंदाचे विचारचक्र सुरू होते. तो कसलातरी गूढ विचारात मग्न झालेला असावा. त्याच्या अवतीभोवती चे विश्व मात्र काही औरच होते. काळ्याकुट्ट अंधारात हवेवर डोलणारा तो भयावह झाडांचा समूह जणू आनंदाचे प्रत्येक पाऊल मोजत होता. सामान्य गावकऱ्यांसाठी असणारी जंगलाची अंतिम सीमारेषा आनंदाने कधीचीच ओलांडलेली होती. तो जंगलाच्या धोकादायक भगत दाखल झालेला होता.तो चालत असलेला या जंगलाचा भाग हा हिंस्र पशूंसाठी ओळखला जात असे. आनंदा तरणाबांड साग शोधण्यात मग्न होता. जंगलातून दूरवरून एक कोल्हा विव्हळत होता. जंगलातील झाडांचा अडथळा चिरून त्या कोल्ह्याचा आवाज आनंदाच्या कानी पडत होता. त्याला प्रतिसाद म्हणून आता जंगलातील इतर कोल्ह्यानेही विव्हळने सुरू केले होते. दूरवरून जंगलात गुंजणारी ती कोल्हेकुई दर मिनिटाला वाढतच जाणारी होती. कसल्यातरी मोठ्या संकटाची ती जणू चाहूल असावी. आनंदाला जंगलातील भयंकर संकटाचा इशारा देण्याचा तो कोल्ह्यांचा केविलवाणा प्रयत्न असावा. ही त्याच्यासाठी नित्याचीच असणारी कोल्हेकुई आज मात्र आनंदाच्या काळजात खोलवर एक वेगळ्याच संकटाची चाहूल उमटवून देत होती. हवेने आता आपला वेग वाढवलेला होता. सुसाट आवाज करणारे वारे झाडांचा अडथळा चिरून येत होते. काळ्याकुट्ट अंधारात रात्री आकाशात चमकणाऱ्या विजांचा क्षणभर दिसणारा लख्ख प्रकाश. त्या लख्ख प्रकाशात दिसणारी झाडांची भयावह सळसळती पाने आनंदाच्या काळजात धडकी भरवून देत होती.
आनंदाला आपल्या आजूबाजूला काहीतरी असल्याची चाहूल लागली होती. आनंदा अचानक थबकला. कंदिलाच्या उजेडात त्याला दूरवर कसल्यातरी प्राण्याचे डोळे चकाकताना दिसले. सुरुवातीला दोन, दोनाचे चार, सहा, आठ अशे वाढत जाणारे एक अर्धवक्र रिंगण त्याच्या समोर तयार झालेले होते. अतिशय क्रूरपणे शाशीराचे लचके तोडून आपली भूक भागवणारे ते तरसाचे झुंड असल्याचे आनंदाला जाणवत होते. आनंदा पुरता घाबरला.
अचानक एका स्त्री-ची किंचाळी ऐकु आली. तसा तरसांचा झुंड नाहीसा झाला. हसण्याचा तो भयावह आवाज आनंदाच्या काळजाचे पाणी करून गेला.
"कोण आहे" आनंदा घाबरून उद्गारला. तसा चारी दिशांना तिचा आवाज घुमू लागला.
आता जंगलात शांतता पासरलेली होती. कोल्हेकुई शांत झाली. वाऱ्यांचा वेग मंदावला. जंगलात अगदी शांतता पसरलेली होती. खाली पडलेल्या सुईचा आवाज येईल इतकी शांतता. आनंदाने आपली मान डावीकडे वळवली. आपल्या हातची कुऱ्हाडी छातीपर्यंत आणली. एका हाताने कंदील समोर करून आनंदा परत उद्गारला, "कोण आहे?"
परत तशीच शांतता. आनंदाला आपलाच आवाज परत ऐकायला येत होता. अचानक समोरच्या झाडाची फांदी मोडली. तो काडाडणारा आवाज ऐकून आनंदा मागे सरला. आनंदाला आपले काळीज थोडे हलके वाटू लागले. त्याच्या अंगावर शहारे उमटत होते. हातापायाला थरकाप सुटलेला होता. आनंदाचे ओठ हलू लागले. तसा तो बोबड्या बोलाणे परात उद्गारला,
एवढ्या वेळा आवाज देऊनही आनंदाला कसलीच प्रतिक्रिया मिळत नव्हती. "काही नाही, तो आपला भ्रम असावा". असा विचार करून समोर पाऊल टाकणार तोच त्याला बारीक घुंगराचा आवाज आला. आनंदा थबकला. त्याने आपले पाऊल मागे घेतले. त्याचा थरकाप वाढायला लागला. आता घुंगराचा आवाज शांत झाला होता. हाती कुऱ्हाड असलेल्या मनगटाने तो आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होता. त्याच्या हातची कुऱ्हाड थरथर हलत होती. आनंद स्वतःभोवती फिरून कंदिलाच्या उजेडाने दूरवर काहीतरी बघण्याचा प्रयत्न करू लागला. डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे तो परत परत बघत होता. जशी आनंदाने समोरच्या दिशेने मान फिरवली तशी त्याला अतिशय तीव्र स्वरूपाची एका स्त्रीची किंचाळी ऐकू आली. किंचाळी एवढी जवळ होती की जणू कुणीतरी आनंदाच्या अगदी कानात किंचाळून गेले असावे. आनंदाच्या काळजाने पाणी सोडले होते. हळूहळू आनंदाचे शरीर गार पडत झाले. त्याच्या काळजाचे ठोके वाढत चालले होते. हळूहळू बधिर होणाऱ्या आनंदाच्या कानात एक स्मित हास्य गुंजु लागले. अतिशय गोड आवाज आनंदाच्या कानी पडला. त्या आवाजाची कोमलता आनंदाचे सर्व भय दूर करून गेली. "कोण आहे? काय पाहिजे?" आनंदा उद्गारला.
तशा झाडाआडून गोड आवाजात काही ओव्या आनंदाच्या कानी पडू लागल्या...
"एक राज्य दडलेलं,
अक्खं गाव गाडलेलं।
त्या राज्याची राणी,
अधुरी प्रेम कहानी।
मधुचंद्राच्या रात्री,
चिपकलेलं प्रेत।
पुनर्जन्म घेऊन।
राजवाड्यात भेट।
घोड्यावरती बसून,
बाशिंग बांधून ये।
मुक्त कर खजिना।
माझा राजा मला दे।
दगा नको,
घात होईल।
अभूतपूर्व,
रक्तपात होईल।
सांगितलेलं एवढंच,
कुणी मला द्या,
बदल्यात लखलखता,
खजिना घ्या."
आनंदा ला काहीच कळलं नाही. आतापर्यंत लोकांनी या स्त्री बद्दल सांगितलेलं आनंदाला खोटं वाटत होतं. तो लोकांना वेड्यात काढत होता. आता मात्र आनंदाची पुरती घाबरली। आतापर्यंत इतका तो कधीच घाबरला नव्हता.
आनंदाने स्वतःला सावरलं. त्याला धनाचा मोह झाला. आपल्याला त्या धनासाठी काय करावे लागेल याची माहिती घाबरून त्याने विचारली.
"मंतरलेल्या वडाभोवती,
मंतरलेली रेत।
मंतरलेल्या रेतीत,
भुकेले एक प्रेत।
प्रेमास मुकलेली,
मंतरलेली कवटी।
एवढीच माझी भूक,
आणखी काय शेवटी?
शोध कवटी,
वाचा देईन।
लढण्याची,
आशा देईन।
शिकलास तर,
टिकलास।
चुकलास तं,
मुकलास।
इतिहास एकदा,
पुन्हा दोहरेल,
सुकलेला पळस,
पुन्हा बहरेल।
हे ऐकून आनंदा थरथरत होता. अचानक काळ्याकुट्ट जंगलात सुसाट वारे सुटले. विजांचा कडकडाट, विव्हळणाऱ्या कोल्ह्यांचा आवाज जणू संकटाची चाहूल करून देत होता. दोन व्यक्ती झाडाच्या आडून आनंदाचा पाठलाग करत आले होते. आनंदाला मात्र त्याची जाणीवही नव्हती.
आनंदाला आपल्या मागून वाऱ्याची तीक्ष्ण झुळूक आल्याची जाणवली. ती झुळूक आनंदाच्या अंगात संचारली. आनंदाला काहीच सुचत नव्हतं. अचानक आनंदाचे डोळे लाल झाले. कंदील भडकला. आनंदाने हातची कुऱ्हाडी समोरच्या स्त्री-च्या आवाजाच्या दिशेने भिरकावली. त्या स्त्री ची किंचाळी जंगलात गुंजू लागली.
आनंदाचे रक्ताळलेले डोळे उघडे ते उघडेच. प्रयत्न करूनही आनंदाचे डोळे बंद होत नव्हते. कंदिलाच्या ज्वाला आनंदाच्या हातावर येऊ लागल्या, आनंदाला मात्र याची जाणीवही होत नव्हती.
झाडाआडी लपलेला "लाला" त्याच्या मदतीला धावला. त्याने कंदील हिसकावून खाली पाडला.आनंदाच्या खांद्यावरची चादरी घेऊन आग विझवली.
" तेरे को बोला था ना मैने, इस जंगल मे अमावस को अकेला नही आने का."
आनंदाने "लाला" कडे वळून पाहिले. आनंदाचा अवतार बघून लाला ची घाबरली. आनंदाने "लाला" ला गच्ची धरून उचलले आणि धमकावले.
"आदमी तो क्या, लाश भी ऊस किले को छु नही सकती."
"हे हे, बघ आनंदा, मला, मला सोड. मै,मै तेरा दोस्त हु।",लाला घाबरून विनवणी करू लागला.
आनंदा भयावह आवाजात उद्गारला, "हाहाहाहा.... लोगो को मारना मुझे भी पसंद नही। तुने वो राज जाणा है लाला. जो राजकुमारी चंद्रा के सोलह रक्षको को आझाद कर देगा। जो हमारे कालवंश को चीरकाल के लिए नष्ट कर देगा। हाहाहाहा....."
काळजाला धडकी भरणारे हास्य करून आनंदाने लाला ला समोरच्या झाडावर फेकले. तसा लाला ठार झाला.
आनंदाने चादरी फडकावली. "दूत हु मैं, कालवंश का, हाहाहाहा...." म्हणत आनंदाने आपली मान मर्यादेच्या बाहेर फिरवली. आनंदाच्या डोळ्यात चमक भरली. त्याच्या मस्तकात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याच्या कानावर ताण येऊन कानाचे पडदे फाटले. कान रक्ताळले,डोळे तिरळे होत गेले. डोळ्यातील त्याच्या काळ्या बाहुल्याची जागा आता हळूहळू पांढरेशुभ्र बुब्बूळ घेत होते. त्याच्या डोळ्यातील काळ्या बाहुल्या आता डोळ्याच्या खोबनिमागे दडल्या होत्या. डोळे अंधारले, आनंदाची मान मर्यादेच्या पलीकडे मुरगाळली गेली. तो जागेवर कोलमडला. तसे जंगलातील वादळ शांत झाले.
क्रमशः...