इकडे भूत-प्रेत सोडले तर आजूबाजूंच्या तालुक्यातील जंगलात फक्त एकच दहशत उरली होती. ती म्हणजे ठाकूर महेंद्रप्रताप. कितीतरी वनाधिकारी त्याने शस्त्राच्या धारेवर तोलून धरले होते. त्याला विरोध करणाऱ्या असंख्य हस्तीचे रक्त त्याच्या तलवारीने पिले होते.
साग, चंदन, जंगली प्राण्यांची शिकार, तस्करी या गुन्हेगारीच्या विश्वातील तो महत्वाचा केंद्रबिंदू होता. त्याचा वरदहस्त ज्या हस्तीच्या डोक्यावर पडत होता तोच राजकारण लढत होता. त्याच्या बाप-दाद्याच्या पिढीपासून जनतेने कधी निवडणूक पाहिली नव्हती.
आनंदा आपला उजवा हात म्हणून नुकताच महेंद्रप्रतापच्या हिट-लिस्ट मध्ये आला होता. पण आनंदाचाच भयंकर मृत्यू मात्र ठाकूर महेंद्रप्रताप च्या गुंड-विश्वात एक वेगळीच दहशत पसरवून गेला.
भितीपोटी त्याचे गडी जंगलामध्ये आतपर्यंत शिरत नव्हते. त्याचा धंदा खालावला. डीलर च्या मागण्या पूर्ण करण्यात तो कुठेतरी कमी पडत होता.खूप काळानंतर त्याला कुणाचीतरी गरज भासत होती. एक निडर, मृत्यू पण ज्याच्यासमोर दहा वेळ विचार करेल असा धिप्पाड, दहशतबाज गॅंग-लिडर त्याला हवा होता. त्याने आपल्या गँगमधील एकाला बोलावले. आणि विचारले,
"शेरखान, एक बंदा धुंडो। जीसे देखकर डर भी काप उठे। ऐसा जो मुर्दो के भी कान फुककर उसमे जान डाले। जीसकी गुरर्रर्रराती आखे हड्डीयो को पानी कर दे"
शेरखान: एक बंदा है मालिक.
महेंद्रप्रताप : कौन?
शेरखान : बाबा अघोरी।
बाबा अघोरी फक्त दंतकथेत पिढ्यान-पिढ्या ऐकली जाणारी एक कल्पना होती. मोजकेच माथेफिरू त्यांना पाहिल्याचा दावा करत होते. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला ते आजही पोलिसांच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये होते.
शेरखानचे उत्तर ऐकून सर्व हसले. महेंद्रप्रताप ने आपला पंजा समोर केला. सर्व गोंधळ शांत झाला.
ठाकूर महेंद्रप्रताप ने बालपणी स्मशानामध्ये अशीच एक व्यक्ती पाहिली होती. दंतकथेनुसार बाबा अघोरीचे वर्णन तंतोतंत जुळत होते. वास्तव की भ्रम या विचारात महेंद्रप्रताप ने ही गोष्ट आपल्या मनातच ठेवली होती.
महेंद्रप्रताप ने शेरखान ला प्रश्न केला, "तुने देखा है बाबा को?"
शेरखान : नही.
महेंद्रप्रताप : तो अभी किस ने देखा?
समोरचा रघु पुढे येऊन मध्येच बोलला, " जल्लाद."
जल्लाद हा खराखुरा जल्लाद नसून गावातील लोकांनी त्याचे टोपण नाव जल्लाद ठेवले होते. काही लोक त्याला माथेफिरू म्हणायचे. आनंदासारखाच त्याचा पण उदरनिर्वाह जंगलातील साग चोरून, शिकारी करून व्हायचा. काही दिवसापूर्वी तो जंगलात गेला तो परतलाच नाही. त्याच्या मागेपुढे कुणीच नातेवाईक नसल्यामुळे त्याचा शोधही घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. काही दिवसांपूर्वी तो अतिशय आनंदात गावभर दवंडी देत फिरत होता. मला बाबा अघोरी चे दर्शन झाले म्हणून गावभर सांगत होता. लोक त्यालाही वेड्यात काढत होते.
काळ्याभोर साडीच्या पदराआडून लख्ख चंद्रप्रकाशात दिसणारा तिच्या "बेंबीभोवतीचा रेताळलेला डोह.", तिच्या कमरेचे मोहित करणारे प्रमाणबद्ध आकुंचन. तिच्या गोऱ्यापान हातावरून वादळाने स्वैरपणे उडणारी झाडांची तुटलेली पाती. तिचे हवेवर उडणारे केस. तिचे क्षणात मोहवून टाकणारे निळेशार डोळे बघून जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ताच विसरून गेलेला प्रशांत गेली पंधरा दिवस जंगलातच भरकटत होता. आनंदाचा मृत्यू त्याने झाडाआडून आपल्या डोळ्याने पाहिला होता. गावातील लोक सकाळी आनंदाचे प्रेत घेऊन गेले. भानावर नसलेला प्रशांत मात्र एक स्वप्न समजून हे सर्व लपुनच बघत राहिला.
"युगो से तरसा,
मेरा ये यौवन है।
दिल मे है चाहत,
ओठो पे मौन है?
भर दिया जहर,
यौवन मे कूट के।
इस जहरिले नशे मे,
आज मरनेवाला कौन है?
हाहाहाहा....." तिचे एक गोड स्मित प्रशांत ला वेडावून गेले होते. पुनवेच्या रात्रीचा शीतल चंद्रप्रकाश तिच्या मखमली नाभीभोती जणू रिंगण घालत होता. प्रशांत तिच्यात मोहून गेला. एक मोहिनी त्याला आपल्या प्रेमाच्या मोहपाशात असा अडकवून गेली की प्रशांत जंगलाच्या आतमध्येच शिरत होता. अंगावर कणभरही मास नसलेल्या प्रशांत च्या डोळ्यात मात्र विलक्षण चमक होती.
इकडे स्मशानात रात्री ठाकूर महेंद्रप्रताप च्या माणसांची गर्दी जमली होती. दहा दिवसापासून महेंद्रप्रताप ला हवा असलेल्या जल्लाद स्मशानातील झाडाला टांगलेला आढळला. त्याच्या डोळ्यात लोखंडी अनुकुचिदार आखोडा अडकवलेला होता. त्याचा सांगाडा चिंचेच्या झाडाच्या उंच फांदीवर जणू झोके घेत होता.
अचानक हवेचा झोत आला. सांगाडा खाली पडला. एकाने हिम्मत करून त्याच्या कवटीचे निरीक्षण केले. त्यावर अनुकुचिदार हत्याराने कोरून कुणीतरी सूक्ष्म नक्षीकाम केलेलं होतं. त्यावर उंच कमान कोरलेली होती. त्याखाली बारीक अक्षरात लिहिलेलं होतं.
" बाबा अघोरी "
"बाबा अघोरी" हे एक असं शापित व्यक्तिमत्त्व होतं जे पौर्णिमेपासून आमावस्येपर्यंत उदार, हजारो संकटापासून रक्षण करणारं तर आमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत क्रूर, राक्षसी, भल्या-भल्यांचा संहार करणारं."
दंतकथेनुसार "बाबा अघोरी" हे सुप्तावस्थेतून कधीतरी जागृत होत असत. त्यांना दीर्घकाळ जागृत करण्याचा एक अतिशय कठीण, भयावह रक्तरंजित विधी हजारो लोकांच्या मुखातून पिढ्यान-पिढ्या समोरच्या पिढीला गोष्टींच्या स्वरूपात लाभलेला होता. याच तंत्र-मंत्रांच्या विधिनुसार बाबा अघोरीला वंशीत केलं जाऊ शकत होतं. तसा प्रयत्नदेखील राजा "प्रतापचंद्र" ने केल्याचा उल्लेख दंतकथेत आढळत होता. परंतु गोष्टींच्या रूपाने आजच्या पिढीपर्यंत आलेल्या या विधीमध्ये कितीतरी बदल झालेले होते.
महेंद्रप्रताप ने जल्लाद ची कवटी उचलली. व आपल्या नजरेच्या जवळ आणली. त्याने दुहेरी अवतरण चिन्हातील नाव वाचलं. "बाबा अघोरी".
त्या कवटीवरील कसल्यातरी बाबीने ठाकूर महेंद्रप्रतापचं लक्ष वेधून घेतलं होतं. कवटीवरील कोरलेल्या नक्षीवरून त्याने आपलं बोट फिरवलं. ठाकूर महेंद्रप्रताप च्या कपाळावर आठ्या उमटल्या. आपल्या दिमाखावर जोर देऊन काहीतरी आठवण्याचा तो प्रयत्न करू लागला. "बाबा अघोरी". या शब्दावरून तो परत परत बोट फिरवू लागला. त्याच्या स्मरणाचा काजवा हळूहळू चमकु लागला. त्याला आपली सोन्याची अंगठी आठवली जी त्याच्या करंगळीच्या बाजूच्या बोटांमध्ये घातलेली होती. त्याने आपल्या सोन्याच्या अंगठीवर कोरलेल्या "बाबा ठाकूर" नावावरून आपलं बोट फिरवलं. परत परत बोटाने अंगठी न्याहाळतांना त्याला "बाबा अघोरी". यातील "बाबा आणि अंगठीवर कोरलेल्या "बाबा ठाकूर" मधील "बाबा" या शब्दाच्या लेखनशैलीत कमालीचं साम्य आढळलं.
त्याचा काजवा फटदिशी चमकला. भरदार मिशीवाला "बंडू सोनार" चा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. ठाकूर महेंद्रप्रताप ची खात्री झाली होती की हे अक्षर बंडू सोनाराचेच आहे.
"पण बंडू सोनार जल्लाद ला का मरेल?"
बंडू सोनार आणि जल्लाद यांच्या विचारांचा रातकीडा ठाकूर महेंद्रप्रताप च्या दिमागामध्ये किर्र-किरत होता. दंतकथेतील "बाबा अघोरी" ला जागृत करणारी सोन्याची समई आणि जल्लाद यांच्या विचारांचे काहूर महेंद्रप्रताप च्या दिमागामध्ये माजले होते. "
"या गावात असा कोण आहे जो बाबा अघोरीला जागृत करू पाहतोय? आणि का? शोधले पाहिजे."
उर्वरित पुढील भागात.