चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।
चला बाया मंडळी,
आवाज आला कानी।
नटून-छटून पंगतीत,
भेटेल म्हतलं राणी।
सुई-वाणी शोधलं,
दिसली नाही सायाची।
अन चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।
दोन पाय लांबवून,
तिनं जागा जिकली।
गोऱ्या गोऱ्या कपाळी,
चमकत होती टिकली।
गर्दी झाली जागेसाठी,
लागल्या दोघी भांडाले।
एकमेकींच्या तांब्यातलं,
लागल्या पाणी सांडाले।
मग बकेटीत बुडवून त्यांनी,
केली प्रॅक्टिस न्हायाची।
चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।
बकेट घेतली हाती,
गरम होता शाक।
पंगतीतला नेता मग,
मारत होता हाक।
हे वाढ, ते वाढ,
सांगत असा मिरवत होता,
बाया बघून गोऱ्यापान,
हौस त्याची जीरवत होता।
बकेट घेऊन फिरू-फिरू,
झाली चाळणी पायाची,
अन चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।
एक पाव्हनी लाजली,
हात करून आडवा।
इथंच उभारू गुढी म्हतलं
करून टाकू पाडवा।
नका अशा लाजू ,
घ्या म्हतलं थोडी।
पाव्हणींन-बाई चाखून पहा,
आमच्या हातची गोडी।
अन वेगळीच होती दादा तिची,
स्टाईल जिलेबी खायाची।
चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।
वाढता-वाढता भौ मी,
पाव्हणीसोबत जमवलं।
लाईन मारू-मारू तिनं,
मले लय दमवलं।
चोरट्या नजरेत हसली ती,
खाऊन कोशिंबीर दह्याची।
अन चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।
पंगतीतला नेता मग,
मायावरच जयला।
उचल म्हणे पात्रं,
हाती घेऊन थैला।
मंग मायी सटकली,
त्याच्यासोबत खटकली।
मले लय मालूम हायेत,
म्हतलं तुये लफडे।
गप्प बस गुमान,
वाजवून टाकीन डफडे।
बस्स कर हौस आता,
पंगतीत बाया पह्याची।
अन चल भौ वाढाले,
पंगत बसली बायाची।