पाऊस यंदा ठरल्यावेळी आलाय. अगदी सांगून येणाऱ्या पाहूण्यासारखा. पर्यावरण पुढील पंचवीस वर्षे अगदी आहे त्या अवस्थेत राहिले तर कदाचित तो दर वर्षी असाच येईल. पर्यावरण नामशेष झाले तर कदाचित तो येणारही नाही.
रंध्ररंध्रात केस उगवावेत तशी आता हिरवळ दाटलीय विस्तृतपणे. झाडांची व्यथा झुलावी तशी कोवळी लुसलुशीत पालवी नव्या चाहुलीच्या पानभाराने वाकलीय. पाने, झाडे, शेंडे, पक्षी, मने, डोंगर, पाणी साऱ्यांचा रंग हिरवा, अगदी मन भरून ओघळावा तसा. हिरव्या रानासारखा. साऱ्यांचाच रंग हिरवा. पण किती त्याच्या छटा? गडद हिरवा. हिरवट जांभळा. पोपटी, फिक्कट हिरवा. काळपट हिरवा. हिरवट काळसर . जांभूळ हिरवट आणि पिवळसर हिरवटसुध्दा. हिरव्या रंगाने आपले अनेकविध अंतरंग जणू रसिकासाठी उघडे करून ठेवलेय! एखाद्या जाणकार गवयाने एखाद्या अविट राग आपल्या स्वरविलसानी अत्यंत टापटिपपने तरीही स्वैरपणे श्रोत्यांसमोर मांडावा आणि त्यातील माधूर्याचे आणि स्रुजन सौंदर्याचे पैलू अनेकविध छटानी श्रोत्यांच्या काळजावर आपल्या अदाकारीची नक्षी कोरीत जावेत नि त्या नक्षीने त्या श्रौत्याला फुलवण्याचे बळ द्यावे तशी या हिरव्या रंगाची कैफियत आहे!
समजणाऱ्यांना आपल्या संपन्न आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाची कहाणी हा रंग न सांगताही सांगून जाईल. पण न समजणाऱ्यांना त्याची व्यथा त्यांनी आपली अनंत काळ जगवणारी काळिजे ब्लेडने चिरून दाखवली तरी भावत नाही. हा दोष कुणाचा? हिरव्या रंगाचे बाळबोध प्यालेल्या ह्या हळव्या सन्मित्राचा तर नक्कीच नाही…
पाऊस येतो म्हणून हा फुलतो, फळतो की हा फुलतो, फळतो म्हणून पाऊस येतो हे सांगणे कठीण आहे. पण याचे नाते मात्र स्त्रीपुरुषाच्या नात्यासारखे. तसेच प्रलयंकारी, तसेच रोमहर्षक तसेच हळवे तसेच संघर्षकारी. तसेच वावटळी. तसेच प्रणयकारी होय. ही श्रुंगारिका लावणी आहे. तशीच ती सोज्वळ, सुगंधित आणि सात्विक प्रणयकथाही आहे. त्याच्यात उद्याला फुलविण्याचे तेज आहे. उज्वल भविष्याला आकार देण्याचा आवेग आहे. अनंत स्रूजनशीलतेचा सुवासिक उन्माद आहे. मुग्धता आहे. स्वागताला येण्याऱ्यासाठी उमदी विनयशीलता आहे. गंध भाळी माळून जाणाऱ्यासाठी अनंत हात आहेत. नास्तिकाची नाती आहेत. अस्तिकाची अभिलाषा आहे. म्हणून हा प्रणय, हा श्रुंगार निर्वीर्य पाण्यासारखा नाही. तो आहे कमळाच्या सतेजाच्या मोगरीच्या धुंद उन्मादीक कैफाचा. गुलमोहराच्या तांबड्या चुटुक पुष्पकौमार्याचा. रूपेरी कडा काजळणाऱ्या काळ्या कुळकुळीत मेघांच्या मर्दुमकीचा.
सृष्टीच्या आवर्तनासाठी पंख फुलवित येणाऱ्या, काळजांची अनंत स्पंदने झणकारीत येणाऱ्या, मनाच्या पाटी पाटीवर हिरवागंध कोरीत येणाऱ्या, पावसाची चाहूल ही नुपुरशंकर छेडीत सागराच्या तीरावर पावले उमटवीत येणाऱ्या एखाद्या अवखळ ललनाच्या चाहूलीपेक्षाही जिवंत असते. सुगंधीत असते. म्हणून व्रुक्ष हलतात. वेळी रूसतात. दर्याची गाज गुंतून पडावी तशी बेलाशक वाजत रहाते. नदीचा कमनीय बांधा कधी दऱ्या खोऱ्यातून तर कधी सपाट प्रदेशाच्या पायधुनीतून प्रत्येकाला ललामधून ठरत धीर-गंभीर वहात रहातो. पक्षी आकाशाला तोलतात. आकाश पाण्यात घर बांधून मुलासारखे पडून राहू लागते. वाऱ्याची स्पंदने शीळ घुमवित बाग- बगिचे फुलवू लागतात आणि बागांचे उन्मादक सुगंध कधीप्रेयसी बनून, कधी समुद्राची सावळी बनून तर कधी वादळाची चकाकती शलाका बनून मनामनातून लहरू लागते. म्हणून स्रुष्टीला बहर येतो.मनगंध फुलावा तसा स्रुष्टीचा रोम रोम मोहरून येतो. प्राण्यांच्या मनाची शीतलता ह्या प्रक्रियेने तर सांवरली नसेल….!
…ते तसेच असले पाहिजे. अन्यथा झाडांनी बहरण्याच्या, नदीने वहाण्याच्या, वाऱ्याने गाण्याच्या, समुद्राने रोरावण्याच्या आणि सूर्याने तेजाळण्याच्या प्रक्रियेला काही अर्थ राहिला नसता…!
झाडे, प्राणी, पाऊस आणि माती हा स्रुष्टीचा एक हुंकार आहे. लयीत फुटलेला. लयीत हिंदकाळणारा. लयीत विरलेला. त्याला पुन्हा साद घातली तरी तो तसाच फुटेल. पहिल्यासारखा. पण त्याला पाऊस पाहिजे. पावसाला झाडे पाहिजेत. झाडाना प्राणी पाहिजेत. याच्यापैकी एकही साथीला नसेल तर बाकीच्यांना वैधत्व प्राप्त झाल्यासारखे कोनाड्यात बसावे लागेल. आणि कालांतराने विरघळून जावे लागेल बर्फासारखे. कुणी एकेकाळी म्हणे इथे हिमयूग होते. उत्क्रांत अवस्थेलाही त्यानी गिळले होते म्हणे!
हे हिमयूग जसे लगेच जातही नाही. त्याला हजारो वर्षे लागतात. ते जातानाही आचकावून जातो. हिमनद्या वाढतात. कमी होतात, पुन्हा वाढतात अशी ही क्रिया असते. अशा प्रक्रियेतूनच ते शेवटी नाहिसे होते. यालाच आंतर हिमयुगीन काळ असे म्हणतात. दोन आचक्यामधलं अंतरही हजारो वर्षे असू शकते. असे नैसर्गिक हिमयूग येण्याची तशी काही चिन्हे नाहीत. पण हिमयूग येऊ शकते. कधीही येऊ शकते. त्यासाठी अणूबाँब वर्षाव करावा लागेल. तो करायलाही वेळ नको. माणूस नावाचा प्राण्याच्या एक कोपरा अजून कुठेतरी पाऊस, धरती, झाडे आणि प्राणी यांच्या हुंदकाराच्या उत्क्रांत अवस्थेसंबंधी जिवंत असावा. अन्यथा एव्हाना हिमयूगाला सुरूवातही झाली असती. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर लगेच प्रचंड उष्णता. ती विरली की मग हिमवरे आणि हिमवर्षाव याच्याशिवाय काही नाही. मग एक मरणप्राय स्मशान शांतता. बर्फासारखीच.
तर पाऊस पाहिजे. पाऊस पाणी आणतो. पाणी झाडे वाढवतात. पाणी प्राण्यांना उत्क्रांत करते. पाणी जमीन हिरवीगार करते. पाणी धरतीवर हिरवे संपन्न फुलवते. पाणी समुद्र तयार करते. समुद्र बाष्प तयार करते. बाष्प ढग तयार करते. नंतर सावळ्या धनाचे गरोदरपण प्रसवते आणि पाऊस पडतो. कधी असाच मुकाट्याने पडतो. कधी गरजून पडतो. पण पडतो.
हा साद असतो हळव्या पावसाचा. हा नाद असतो अवखळ पावसाचा. हा प्रतिसादही असतो अंगभर चिंबणाऱ्या पावसाचा. व्रुक्षराजींच्या सहाय्याने आणि साक्षीने पाझरणाऱ्या आणि आठ महिने यांच्यासाठी सर्वस्वाची होळी करून बेगमी करून पुन्हा यांच्यासाठीच कधी अवखळ कधी सोज्वळ बनून येणाऱ्या पावसाचा.
अब्जावधी वर्षाचा याचा आलेख कधी चुकला नाही, कधी रूसला नाही. कारण तो या स्रुष्टीच्या आवर्तनासाठी होता. इथल्या झाडासाठी होता. इथल्या नद्यासाठी होता. इथल्या डोंगराच्या हिरव्या स्वप्नासाठी होता. इथल्या प्राण्यांच्या प्रमाण परिष्कारासासाठी होता. त्याचे बोट धरून आकाश मोठे झाले. झाडे मोठी झाली. नद्या मोठ्या झाल्या. समुद्र डोहशील झाला. प्राणी, विशेष म्हणजे माणूस माणूस झाला. हा पाऊस ही झाडे आज बैचेन आहेत वेड्या झालेल्या माणसासारखी...
विष भिनलेल्या प्राण्यासारखी…
-सुमेध शिवाजी जाधव.